लातूर - फेसबुकवरून एका महिलेची ओळख झाल्याने दोन बांगला देशी नागरिक लातुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तद्नंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र याबाबत शनिवारी रात्री उशिरापर्यंत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी सांगितले, फेसबुकवर लातुरातील एका महिलेचा बांगला देशी नागरिकांशी संपर्क झाला. त्याच ओळखीच्या आधारे ते दोघेही सदर महिलेला भेटण्यासाठी लातूरमध्ये आले. ही माहिती खब-याकडून स्थानिक पोलिसांना कळली. ते दोघे नेमके कोणत्या हेतूने आले, याची पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रे तपासली जात आहेत. यासंदर्भात अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला, परंतु बांगला देशी नागरिक ताब्यात असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. याबाबत शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाळत ठेवून पकडले...बांगला देशी नागरिक शहरात आले होते. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. ते कुणाला भेटले, कुठल्या कारणासाठी भेटले, यावर पोलिसांची नजर होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कसून चौकशी सुरू...लातूर शहरात एका महिलेला भेटण्यासाठी बांगला देशातील आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेची आणि बांगला देशी नागरिकांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. या घटनेचे संदर्भ शोधण्यासाठी स्थानिक पोलीस दोघा बांगला देशींची कसून चौकशी करीत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.