लातूर : भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या दोघा बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवत लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी के.एम. कांयगुडे यांनी २ वर्षे ३ महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लातूर येथील दशहतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम यांना कोळपा (ता. लातूर) येथे दोन बांगलादेशी नागरिक थांबले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह ७ जुलै २०१८ रोजी कोळपा येथे छापा मारला. त्यावेळी कबीर रजाउल्ला उर्फ शहाबुल्ला (२६), मोहम्मद मुरनावत हुसेन दिनार (२२ रा. फेनी चतुग्राम, बांगलादेश) यांना ताब्यात घेतले. अधिक झाडाझडती घेतली असता, दोन्ही बांगलादेशी तरुणाकडे भारतात येण्यासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅन कार्ड, कागदपत्रे, मोबाईल जप्त करण्यात आले होते.
याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे दोघे कोळपा येथील महिलेशी व्हॉटसअपच्या माध्यमातून संपर्क केला होता. ते सदर महिलेशी लग्न करण्याच्या उद्देशाने त्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली होती.