औराद शहाजानी : परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. त्यामुळे नदी, नाले, तुंडूब झाले असून, मांजरा व तेरणा नदी दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मांजरा-तेरणा नदीच्या संगमावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन्ही पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात शनिवारी दुपारपासून संततधार पाऊस सुरु आहे. गेले तीन दिवस झालेल्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या मांजरा व तेरणा नद्या दुथडी भरुन वाहत आहे. दोन्ही नद्यांवरील बंधाऱ्यांची दारे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात नदीपात्रात सोडल्याने संगमावर पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. यातच औराद-वाजंरखेड पुल पाण्याखाली गेला असून, औराद-तुगाव जाणाऱ्या पुलावरुनही पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीपलिकडील २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे.
यातच पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसल्याने संगमाजवळील शेतकरी शिवपुत्र आग्रे, दिंगबर माने, रामदास खरटमोल, नाईकवाडे या शेतकऱ्यांची सोळा जनावरे शेतात अडकली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी मोतीराम भोई, रामसिंग भोई, गंगाराम भोई यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात ट्युबच्या सहायाने जाऊन शेतकऱ्यांसह पशूधन सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, औराद शहाजानी येथे संततधार पावसामुळे काही जुन्या घरांची पडझड झाली आहे. यात बलभीम कोंडिबा सुर्यवंशी यांची घराची भिंत पडली आहे.
कर्नाटक बंधाऱ्याचे दार उघडेना...दोन नद्यांच्या संगमावर कर्नाटक सरकारने बांधलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचे एक गेट खराब झाल्याने वाहत्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे औराद तगरखेडा हालसी या भागातील बॅकवॉटर वाढले असून, परिसरातील शेतजमिनीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. संबधित दरवाजे उघडण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.