उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील कुमठा खुर्द येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने गावातील दोन घरांमध्ये प्रवेश करून कुलूप-कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत गुरुवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील कुमठा खु. येथील फिर्यादी संतोष माधवराव केंद्रे (वय ३८) यांच्या घरचे कुलूप-कोंडा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे २ लाख) व रोख रक्कम २० हजार असा एकूण २ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच याच गावातील दत्ता भिवाजी केंद्रे यांच्याही घराचा कुलूप-कोंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ४ लाख ४८ हजार) व रोख रक्कम ३० हजार असा एकूण चार लाख ७८ हजार ५९३ रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत संतोष माधवराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरुवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चिरले करीत आहेत.