लातूर : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने हिसकावत पळ काढणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाच मंगळसूत्र, चोरलेली दुचाकी असा ३ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चौकशी केली असता अन्य सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी आणि महिलांचे दागिने पळविणारऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे सोमवारी आरोपी हे चोरीतील दागिने एका सराफाला विकण्याच्या प्रयत्न करत असताना दोघांना जुने रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अधिक विचारपूस केली असता त्यांनी रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले (१९, रा. अंजनसोंडा, ता. चाकूर जि. लातूर) आणि अभंग काशिनाथ घोलपे (२९, रा. काळेवाडी ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर) अशी नावे सांगितली आहेत.
अधिक चौकशी करून, पोलिसी खाक्या दाखविला असता, लातूर शहर आणि जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांचा उलगडा झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून हिसकावत पळ काढल्याची कबुली दिली. याबाबत त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नाना भोंग, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांनी केले गुन्हे...
लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या दोघांनी गुन्हे केल्याचे समोर आले आहे. यात एमआयडीसी - २, गांधीचौक ठाणे - १, लातूर ग्रामीण पोलिस ठाणे - १, उदगीर शहर ठाणे - १ तर एमआयडीसी ठाण्यात दुचाकी चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.