बेलकुंड (जि. लातूर) : देवदर्शनासाठी तुळजापूरला जाणाऱ्या एका जीपची आणि टँकरची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघजण जागीच ठार तर आठजण जखमी झाल्याची घटना औसा- तुळजापूर महामार्गावर बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अरुण कोयंडे (42), विवेक राजेशिर्के (40, दोघेही रा. शेंद्री, जि. सातारा, दादर मुंबई) असे मयत दोघांची नावे आहेत. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथून कार्यक्रम आटोपून तुळजापूरकडे देवदर्शनासाठी भाविक जीपने (एमएच 24, सी 6457) बुधवारी जात होते. दरम्यान, उजनीहून बेलकुंडकडे भरधाव टँकर (एमपी 39, जी 1863) येत होता. बेलकुंडनजीकच्या टाका पाटीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अरुण कोयंडे व विवेक राजेशिर्के या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जीपमधील मच्छिंद्र कल्याणकर (35), मच्छिंद्र भालेकर (37, दोघेही रा. येरोळ, ता. शिरूर अनंतपाळ), संजय चव्हाण (33), नितीन वाघमारे (35), नितेश कतडदोड (38, रा़ मुंबई) तसेच टँकरमधील हरिनारायण यादव, प्रमोद तिवारी व कपिल मुनी हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जीपचा चक्काचूर...
हा अपघात इतका भीषण होता की टँकर उलथून पडले होते़ तर जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी व भादा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविले.