लातूर : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या ऑटो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकीस धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वा. च्या सुमारास उदगीर- जळकोट मार्गावरील एकुर्गा पाटीजवळ घडली.
आयलुबाई केंद्रे (५०) व रावसाहेब केंद्रे (५५, दोघेही रा. माळहिप्परगा, ता. जळकोट) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथून अंत्यसंस्कारासाठी आयलुबाई केंद्रे व रावसाहेब केंद्रे हे दोघे ऑटो (एमएच २२, ३६४२) मधून गुरुवारी दुपारी उदगीरला निघाल होते. हा ऑटो एकुर्गा पाटी येथे पोहोचला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि उभ्या असलेल्या दुचाकीस (एमएच २४, बीएल ४९४७) ला जोराची धडक दिली. यात ऑटो उलटून वरील दोघे मृत्यूमुखी पडले.
हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उदगीरच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उदगीर येथे उपचार सुरु आहेत. या घटनेची रात्री उशिरापर्यंत जळकोट पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. उदगीरहून अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.