- बालाजी थेटेऔराद शहाजानी (जि.लातूर) : निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर, पिरपटेलवाडी व अंबुलगा या गावांना रविवारी पहाटे व रात्री उशिरा भुकंपाचे दोन सौम्य धक्के बसले आहेत. पहाटे झालेल्या धक्क्याची २.१ तर रात्री उशिरा १.९ रिश्टर स्केल भुकंपाची नोंद औराद शहाजानी येथील भुकंपमापक केंद्रावर झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.
निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ६ सप्टेंबर रोजी भुगर्भातून आवाज आला होता. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिल्ली येथील शास्त्रज्ञ व स्वारातीम विद्यापीठातील तज्ञ्जांसोबत हासोरी परिसरात भेटी दिल्या होत्या. त्यानुसार औराद शहाजानी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भुकंपमापक यंत्र बसविण्यात आले होते. हासोरीसह परिसरातील नऊ गावांमध्ये धक्क्यांची मालिका सुरुच असून, आतापर्यंत २३, २६, २९ सप्टेंबर तर १, ४, ९ ऑक्टोबर रोजी भुकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद झाली आहे.
रविवारी पहाटे १.१३ मिनिटांनी २.१ तर रात्री उशिरा ९.५७ मिनिटांनी १.९ रिश्टर स्केलचा धक्क्याची नोंद औराद शहाजानी येथील भुकंपमपाक केंद्रावर झाली असल्याचे जिल्हा भुकंप मापक अधिकारी किशोरसिंह परदेशी यांनी सांगितले.