लातूर : राज्यात आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येणार नाही. आघाडी करूनच सत्ता मिळवावी लागणार आहे. या सत्तेमध्ये आंबेडकरी पक्ष समुहांनी मागे राहू नये. राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करून सत्तेत गेले पाहिजे. आंबेडकरी पक्षांचे ऐक्य हवे. प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) ऐक्याचे नेतृत्व करावे. त्यासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट निर्माण झालेले आहेत. यामुळे सत्ता मिळू शकणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सत्ता मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. रिपब्लिकन ऐक्य घडवावे लागेल. मात्र, प्रकाश आंबेडकर त्यासाठी तयार नाहीत. एकत्रित आंबेडकरी पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. मंत्री पदाच्या अथवा सत्तेच्या मी मागे नाही. परंतु, मी ज्यांच्यासोबत जातो तो पक्ष सत्तेत येतो आणि मलाही मंत्रीपद मिळते, असेही ते म्हणाले. बसपा पक्ष बॅकफूटवर गेलेला आहे. त्यामुळे आता देशात बसपाची जागा रिपाइं घेत आहे. उत्तर प्रदेशमध्येही रिपाइंच राहणार आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होत आहे. तरुणांनी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत वेगवेगळे रोजगार उभे करून स्वत:च्या पायावर उभे टाकले पाहिजे. पत्रपरिषदेला खा. सुधाकर शृंगारे, चंद्रकांत चिकटे यांची उपस्थिती होती.
भोंगे उतरविण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध... आपल्या देशात लोकशाही आहे, याचे भान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठेवावे. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्याची जी त्यांनी भूमिका घेतली आहे, त्याला आमचा विरोध आहे. तुम्हाला मंदिरात भोंगे लावायचे असेल तर लावा, मस्जिदीवरील भोंग्यांना तुमचा विरोध कशासाठी, असा सवालही आठवले यांनी केला.
शरद पवार पुरोगामी नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला. याबाबत आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा तोल गेलेला आहे. शरद पवार पुरोगामी नेते आहेत. ते जातीयवादी नाहीत. त्यांनी आपल्या राजकारणामध्ये नेहमीच धर्मनिरपेक्ष भूमिका मांडलेली आहे. त्यांना जातीयवादी म्हणणे चुकीचे आहे, असेही आठवले म्हणाले.