उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सतत छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा जीव गमवावा लागला आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उदगीर शहरातून लातूरकडे जाणारा रेल्वे उड्डाणपुल सुरु झाला. परंतु, या उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आतापर्यंत या उड्डाणपुलावर चार जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला आहे.
शुक्रवारी पहाटेच्यावेळी एमएच २४, डब्ल्यू ९२१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन अंकुश भास्कर मोरे (५०, रा. तलमुड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे उदगीरकडे येत होते. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणावर पोहोचले. परंतु, अंधारात अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले असावेत, असा अंदाज तपासिक पोलिसांनी व्यक्त केला. सकाळी या भागातील नागरिकांना ही घटना दिसली असता ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सदरील व्यक्तीस उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.