शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून, चक्कर येऊन, सर्पदंश, विजेचा शाॅक लागून व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये दिले जातात. ही योजना शिक्षण विभागाच्या वतीने राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यात मागील दोन वर्षांत ८१ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यात पाण्यात बुडून ९, विजेचा शाॅक लागून ३, अपघात ६, चक्कर येऊन १ तर अन्य कारणांमुळे ६२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व मयत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये २०१७-१८ व २०१८-२०१९ या वर्षाचा समावेश आहे.
२०१७-१८ मध्ये ६० तर २०१८-१९ मध्ये २१ प्रस्ताव
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागाकडे ६० प्रस्ताव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी दाखल झाले होते. तर २०१८-१९ या वर्षात २१ प्रकरणे दाखल झाली होती. यामध्ये औसा, लातूर, जळकोट, देवणी, निलंगा, कासार बालकुंदा, किल्लारी, उदगीर, वांजरवाडा, गंगापूर, कासारशिरसी, टाका आदी ठिकाणच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साह्य करण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविली जाते. त्या अंतर्गत दोन वर्षांत ८१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. अनुदान संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
- भगवान फुलारी,
प्र. शिक्षणाधिकारी
शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून, चक्कर येऊन, सर्पदंश, विजेचा धक्का लागून तसेच इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मदतीसाठी सदरील योजना राबविली जाते. शिक्षण विभागाच्या वतीने प्राप्त प्रस्तावांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रस्ताव मंजूर झाले. शाळास्तरावरही या योजनेची माहिती पोहोचविली जात असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.