लातूर : लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर व अन्य छोट्या - मोठ्या गावांचा पाणीपुरवठा असलेला मांजरा प्रकल्प यंदा भरण्याच्या मार्गावर आहे. धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर सिंचनालाही पाणी मिळणार आहे. १५ ऑक्टोबरच्या पाणीसाठ्यावर कालवा समितीच्या बैठकीत यावर निर्णय होईल. त्यातून लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे.
मांजरा धरण २०२०, २१, २२ मध्ये भरले होते. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले. २०२२ नंतर प्रकल्प भरला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळाले नाही. यंदा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. धरणात दररोजची आवक सुरू आहे. ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याची मागणी आली तर उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होऊ शकतो. मागणी नाही आली तर उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय होईल. यामुळे तीन जिल्ह्यातील १८,२२३ हेक्टर शेतावरील पिकांना पाणी मिळणार आहे.
डाव्या, उजवा कालव्यातून किती हेक्टर सिंचनमांजरा प्रकल्पाचा डावा कालवा ९० किलोमीटर अंतराचा आहे. या कालव्यातून १० हजार ६२९ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आहे, तर उजवा कालवा ७८ किमी अंतराचा असून, या कालव्यातून ७ हजार ६०४ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. दोन्ही कालवे मिळून १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. पण, दरवर्षी पाऊस पडत नाही. प्रकल्प भरत नाही. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठा झाला आहे.
जिल्हानिहाय सिंचन क्षेत्रलातूर :१२८७९ हेक्टरबीड : ४,७१७धाराशिव : ६२७