उदगीर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीर शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये रुग्णालय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शाळा, महाविद्यालयांसह व्यापारी आस्थापनांनी व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. तसेच देवणी तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू असून, मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे राज्यातील मराठा समाजातील युवकांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या आंदोलकांमध्ये मुस्लीम समाजाचे युवक व नेत्यांचा सहभाग लक्षणीय होता.
सर्व आंदोलकांनी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर फिरून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मराठा समाजाने बंदची हाक दिल्यामुळे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा व व्यापारी आस्थापने बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने बसेस रस्त्यावर उतरविल्या नाहीत. पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप भागवत, शहर पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.