उजनी ( लातूर) : रेशन दुकानदारांनी ई- पॉस मशीनचा वापर करुन धान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या असल्या तरी येथील दुकानदार त्याचा वापर करीत नाहीत़ तसेच नागरिकांना पावत्याही देत नाहीत, असा आरोप करीत येथील नागरिकांनी सोमवारी गावातील तीन रेशन दुकानांना टाळे ठोकले़
औसा तालुक्यातील उजनी येथे तीन रेशन दुकाने आहेत़ रेशन दुकानच्या धान्यात गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ई- पॉस मशीन दिल्या आहेत़ त्याआधारेच ग्राहकांना धान्य देऊन पावत्या द्याव्यात अशा सूचना केल्या आहेत़ परंतु, येथील स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना पावत्या देत नाहीत़ एखाद्या ग्राहकाने चौकशी केल्यास तहसील कार्यालयाकडूनच आॅनलाईन पध्दत सुरु करण्यात आली नाही, असे सांगितले जाते़
विशेष म्हणजे, रेशन दुकानदार ग्राहकांचा मशीनवर अंगठा घेतात़ परंतु, पावती देत नाहीत़ शिवाय, स्वत:कडे एक रजिस्टर ठेऊन त्याची नोंद ठेवत आहेत़ ग्राहकांचा अंगठा घेतला जात असताना पावती का दिली जात नाही? तसेच दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावण्यात आले नाहीत़ चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात़ त्यामुळे येथील मानवधिकार सुरक्षा संघाच्या वतीने तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती़ परंतु, त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर सोमवारी तीन रेशन दुकानांना ग्राहकांनी टाळे ठोकले़ यावेळी दक्षता कमिटीचे सदस्य राजू पाटील, मुकेश पाटील, आझम पठाण, शफीक शेख, बिभीषण देवकर, युवराज गायकवाड, सिद्ध आळंगे आदी उपस्थित होते़
चौकशी करुन सूचना करुऔसा तहसीलच्या तालुका पुरवठा अधिकारी वर्षा मनाळे म्हणाल्या, उजनी येथील रेशन दुकानदारांची चौकशी केली जाईल़ त्यानंतर सूचना केल्या जातील़ जर पावत्या दिल्या जात नसतील तर कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या़