लातूर : पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून तीन दुकाने करण्यात आली होती. त्या दुकानांना महानगरपालिकेच्या पथकाने सील केले आहे. ही कारवाई मनपाच्या डी झोन विभागाअंतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी केली.
मनपाच्या डी झोनमधील सावेवाडी येथील ओडियाराज चौकामध्ये असलेल्या एका मालमत्ताधारकाने पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम केले. याबाबत महापालिकेकडून अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित व्यक्तीला सूचित केले. मात्र बांधकाम काढले नाही. त्यामुळे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार तसेच नगररचनाकार यांच्या आदेशाप्रमाणे सावेवाडी येथील तीन दुकानांना सील करण्यात आले असल्याचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले. पथकामध्ये बंडू किसवे यांच्यासह कर निरीक्षक अहमद शेख, स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख, देवेंद्र कांबळे, कनिष्ठ अभियंता नौशाद शेख, गफार इनामदार, भालचंद्र कांबळे, संतोष ठाकूर, अशोक पवार, रहीम शेख, दत्ता गंगथडे, महादेव बेलकुंडे, किशोर भालेराव, महादू पवार, समीर शेख, महबूब शेख, जावेद शेख, दत्ता कदम, मुस्तफा शेख आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.