लातूर : प्रत्येक कुटुंबास दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर, जलकुंभासाठी जागा मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने ही विहीर, जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र शासनाच्या वतीने सन २०२१ पासून जलजीवन मिशन सुरू करण्यात आले. प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना घरपोच, पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. विशेषत: २० पेक्षा अधिक कुटुंब संख्या असलेल्या वाडी-तांड्यावरील नागरिकांनाही घरपोच नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, वाडी-तांड्यांसाठी एकूण ९२८ कामे मंजूर करण्यात आली. ती वर्षाच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे.
स्थानिक राजकारणाने जागेचा तिढा सुटेना...जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर खोदण्यासाठी, तसेच जलकुंभ उभारण्यासाठी जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. मात्र, गाव पातळीवरील स्थानिक राजकारणाचा अडसर निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्य शासनाने विहीर आणि जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही...जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ९२८ कामे हाती घेण्यात आली असली तरी आतापर्यंत १९१ कामे पूर्ण झाली आहेत. १०१ कामे ७५ टक्क्यांच्या वर आहेत. १८३ कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. २४९ कामे २५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत, तर १८६ कामे २५ टक्क्यांच्या आत आहेत. १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - पूर्ण कामे - अद्याप सुरू नसलेली कामेअहमदपूर - ३० - ००औसा - ४४ - ०२चाकूर - १८ - ००देवणी - ०५ - ०६जळकोट - ०५ - ००लातूर - १३ - ०१निलंगा - ३४ - ०४रेणापूर - १६ - ००शिरूर अनं. - ०४ - ०४उदगीर - २२ - ०१एकूण - १९१ - १८
दंड आकारून कामास मुदतवाढ...जलजीवन मिशनअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून कंत्राटदारांकडून आढावा घेतला जात आहे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करीत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच काही दिवसांपूर्वी कंत्राटदारांकडील पाच कामेही काढून घेण्यात आली आहेत.
अन्यथा योजना रद्द करण्याची शिफारस...विहीर, जलकुंभासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने काही कामे सुरू झाली नाहीत. दरम्यान, शासनाने ही कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतींना माहिती देण्यात आली आहे. आठवडाभरात जागा उपलब्ध करुन न दिल्यास योजना रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा