लातूर : खरीप हंगाम पंधरा दिवसांवर आल्याने जिल्ह्यात खरीपाची तयारी सुरु आहे. शेतकरी बी- बियाणे, खतांची चौकशी व खरेदी करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि योग्य दराने बी- बियाणे मिळावेत म्हणून कृषी विभागाने छुपी गस्त सुरु केली आहे. ज्यादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात ६ लाख ५० हजार ९६ हेक्टरवर खरीपाचा पेरा अपेक्षित असून त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होईल. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपत आहेत. तसेच बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात केली आहे. यंदा मुबलक प्रमाणात बी- बियाणे, खते उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. दरम्यान, कृषी सेवा केंद्र चालकांनी कृत्रिम टंचाई निर्माण करुन ज्यादा दराने बी- बियाणांची विक्री करु नये. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छुपे पथक गस्त घालत आहे. तसेच बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर पथके नियुक्त करण्यात आली आहे.
कापसाच्या विशिष्ठ वाणाच्या बियाणांचा आग्रह करु नका...जिल्ह्यात अहमदपूर व जळकोट तालुक्यात कापसाची लागवड केली जाते. सर्व कंपन्यांचे कापूस बी.टी. वाण चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. तसेच कापूस बियाणांच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कृषि सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सतत तपासणी सुरुजिल्ह्यातील शेतकरी विविध कंपन्याच्या कापूस बियाणांना पसंती देतात. या बियाणांना मागणी असल्याने त्यांच्या विक्रीत वाढ होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातून विक्रेत्यांकडून या बियाण्यांची जादा दराने विक्री केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तालुका कृषि अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कृषि केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या पथकाकडून सतत तपासणी सुरु आहे. कृषि सेवा केंद्रातून वाढीव दरात कापूस बियाणे विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.