किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव (का) येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या औरंगाबादच्याहॉकीपटू भावंडांचा बडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रोहन राम वडमारे (१८) आणि रोहित राम वडमारे (१६), अशी त्यांची नावे आहेत.
औरंगाबाद येथील मूळचे रहिवासी हे भाऊ टाकळगाव येथे सुटीनिमित्त आजोळी आले होते. सोमवारी दुपारी दोघे आजोबासोबत शेताकडे गेले होते. शेतानजीक तलावात पोहण्यासाठी ते उतरले. यावेळी रोहित हा पाण्यात बुडत असल्याचे रोहनच्या लक्षात आले. आपल्या भावाला वाचविण्यासाठी तोही पाण्यात उतरला. मात्र, पुढे पुढे तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तीन वाजता रोहनचा तर मंगळवारी दुपारी १ वाजता रोहितचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. घटनास्थळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सपोनि. के.एन. चव्हाण, तलाठी जाधव यांनी भेट दिली.
राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरीराष्ट्रीय पातळी हॉकी खेळाडू प्रियंका आणि प्रीती वाडमारे यांचे हे दोघे सख्खे भाऊ होते. रोहनने राज्य, राष्ट्रीय पातळीवर हॉकीची स्पर्धा गाजविली आहे. रोहित यानेही राज्यपातळीवरील हॉकी खेळात चांगली कामगिरी केली आहे. दोघांनी ज्ञानदीप विद्यालयाकडून हॉकीत नेत्रदीकप यश मिळविले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहन हा गत वर्षी विद्यापीठाकडून खेळत होता. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने ते आजोळी टाकळगावाला आले होते. दरम्यान, ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली.