निलंगा : लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम हे निकृष्ट झाल्याने अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. मुगाव ते ताजपूरपर्यंतचा महामार्ग त्वरित दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी महामार्गावर पडलेल्या भेगांमध्ये बेशरमाचे झाड लावून पूजन करीत निषेध व्यक्त केला.
लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच बहुतांश ठिकाणचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर भेगा पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुलाचे अर्धवट काम, पर्यायी रस्ता तसेच भेगा पडलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह निटूर सर्कलमधील नागरिकांनी मंगळवारी सकाळी अनोखे आंदोलन केले. महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. अर्धवट कामे पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, मुगावचे सरपंच विशाल वाडीकर, हनुमंत पाटील, दत्तात्रय पिंड, सुनील कोळेकर, माधव रक्ताटे, जितेंद्र जाधव, हरी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पूलाचे काम पूर्ण करा...मसलगा दरम्यानचा अर्धवट असलेला पूल, बाभळगाव व तळीखेड परिसरातील रस्ता, औराद शहाजनी येथील रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.