येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत माजी आ. भालेराव म्हणाले की, निलंगा तालुक्यातील बामणी येथे जगन्नाथ शिंदे या युवकाचा खून झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी केवळ दोनच आरोपींना अटक केली होती; परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आज संपूर्ण आरोपी अटक करण्यात आले आहेत. या घटनेमागील खऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घ्यावा.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक जिल्ह्यांत दलितांवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेवर राज्याच्या गृहमंत्र्यांचा वचक राहिला नाही. राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. ठाकरे सरकारने निष्क्रिय गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही माजी आ. भालेराव यांनी केली.
यावेळी गोविंद सूर्यवंशी, गंगाबाई कांबळे, सत्याभाई शिंदे, संजय हलगरकर, अजय कांबळे, सोमनाथ कदम, सतीश शिंदे, सीताराम कांबळे, राम कांबळे, बजरंग कांबळे, प्रदीप थोरात, ओम शिंदे आदी उपस्थित होते.