श्यामलालमध्ये राष्ट्रीय
गणित दिवस साजरा
उदगीर : येथील श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंद चोबळे होते. त्यांच्या हस्ते श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश बिरादार यांनी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे उत्तम गणित जाणकार ही होय, असे मत व्यक्त केले. श्रीनिवासन रामानुजन यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक चोबळे हे श्रीनिवासन रामानुजन यांचे विचार व गणिती संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये उतरवू या, गणिताची गोडी निर्माण करू या, असे म्हणाले. प्रास्ताविक बारोळे यांनी केले, तर आभार राहुल नादर्गे यांनी मानले.
सैनिकी विद्यालयात
गणित दिन साजरा
उदगीर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात गणित दिन साजरा करण्यात आला. मंचावर प्राचार्य वसंत कुलकर्णी, उज्ज्वला वडले, नागेश पंगू, सीमा मेहत्रे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के उपस्थित होते. उज्ज्वला वडले म्हणाल्या गणित विषयाचा चांगला सराव केल्यास हा विषय अवघड वाटत नाही. रामानुजन यांनी गणिताची चार हजार सूत्रे तयार करून ठेवली आहेत. त्यांना बालपणापासून गणित या विषयात आवड होती, असे ते म्हणाले. नागेश पंगू यांनीही आपले विचार मांडले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गणित विषय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले, तर आभार सीमा मेहत्रे यांनी मानले.
लालबहादूरमध्ये
गणित दिन साजरा
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात भारतीय गणित दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रदीपराव कुलकर्णी, उपमुख्याध्यापक निवृत्तीराव दराडे, रामेश्वर मलशेट्टे, अंबूताई दीक्षित, लालासाहेब गुळभिले आदी उपस्थित होते. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्यावर मलशेट्टे यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात दराडे म्हणाले, गणित हा सरावाने साध्य होणारा विषय आहे, तसेच गणिताविषयीची मनातील भीती दूर करा. गणितासारखा सोपा विषय दुसरा नाही. आपल्या जीवनात गणिताचे किती महत्त्व आहे, हेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आरती तेलंग यांनी, तर प्रास्ताविक कृष्णा मारावार यांनी केले. आभार प्रशांत होके यांनी मानले.
देवणीत शेतकरी अनुदान
वाटपाला बँकांचा अडथळा
देवणी : येथील शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात येथील बँकांचाच अडसर असल्याचे समाेर आले आहे. परिणामी, शासनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा हाेण्यास विलंब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने हेक्टरी दहा हजार रुपयाचे अनुदान मंजूर केले. ते अनुदान महसूल प्रशासनाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी शहरातील विविध बँकांना याद्या पाठविण्यात आल्या आहेत.
या अनुदानाचे वाटप देवणी येथील बँका गेल्या अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांतून केला जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, येथील काही बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे बँकांतील व्यवहाराला विलंब हाेत असल्याचे समाेर आले आहे, तर काही बँकांना शाखा व्यवस्थापकच नाहीत. त्याचबराेबर बँकेतील नेटवर्किंगचा अडथळा आहे. नेट नाही, वीजपुरवठा नाही, अशी कारणे बँकांमधील कर्मचाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. शेतकरी अनुदानासोबतच इतर लाभार्थी, निराधार आणि निराश्रित लाभार्थ्यांचे अनुदान वाटप वारंवार रखडत आहे. शिवाय, शेतकऱ्यांच्या कर्जवाटपातही अडथळे येत आहेत.