औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परीसरात गुरुवारी सायंकाळी जाेरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, लातूर जहीराबाद महामार्गावरील जमखंडी जवळचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुलाच्या पलीकडील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
लातूर शहरासह जिल्ह्यातील औराद शहाजनी परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा द्राक्ष भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील घोणसी भागात तर गारांचा मारा मोठ्या प्रमाणात झाला.
औराद शहाजानी च्या हवामान केंद्रावर सकाळी आठ वाजेपर्यंत ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतातील बांधाचे कट्टे वाहून गेले आहेत. नाले भरून वाहत आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील सिमा भागात तर याहीपेक्षा जास्त पाऊस आहे. लातूर- जहीराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहाजानी शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील ओढयावरील पर्यायी पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा महामार्ग पहाटेपासुन वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे पर्यायी राष्ट्रीय महामार्ग मुबंई- हैद्राबाद या महामार्गकडे वाहतुक वळवण्यात आली आहे.
औराद शहाजानी येथील शाळा, महाविद्यालयात सिमा भागातील विद्यार्थी येतात. सद्या येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बी.कॉम, बीएससीच्या परीक्षा सुरू आहेत. ही परीक्षा कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थी देत आहेत दरम्यान पुलावरील वाहतूक ठप्प झाल्याने हे विद्यार्थी पूलाच्या पलीकडील बाजूस अडकले आहेत. दरम्यान, याविषयी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रदीप पाटील म्हणाले की, २५ टक्के विद्यार्थी हे पावसामुळे परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. याची माहिती विद्यापीठाला कळवून या विद्यार्थ्यांसाठी काय सोय करता येईल, यावर विद्यापीठाचा सल्ला घेणे चालू असल्याचे सांगितले.