लातूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७.४९ टक्के क्षेत्रावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला गती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्षे, टरबूल, आंबा, खरबूज, पपईसह भाजीपाल्याचे जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या १८ हजार १४८ आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत केवळ ४ हजार ४५७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ३७.४९ टक्के आहे. तर पंचनामे पुर्ण झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २१५ आहे. दरम्यान, दोन दिवसांत पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.
६३ टक्के क्षेत्रावरील पंचनामे कधी होणार...गेल्या चार दिवसांत ३७.४९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. यात लातूर तालुक्यात २७ टक्के, रेणापूर २३, निलंगा ४५, शिरुर अनंतपाळ २३, देवणी ५९, उदगीर ४०, जळकोट ०७, अहमदपूर १५ तर चाकूर तालुक्यात १९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे करण्यात आले. त्यामुळे उर्वरित ६३ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
१८ हजार १४८ बाधित शेतकरी संख्या...अवकाळी पाऊस व गारपीटीने जिल्ह्यातील १८ हजार १४८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नूकसान झाले. यात सर्वाधिक निलंगा तालुक्यातील ५ हजार ७५० शेतकरी आहेत. त्या खालोखाल रेणापूर तालुक्यातील ४२४५, देवणी ३४५८, लातूर १२००, शिरुर अनंतपाळ १३३४, उदगीर ४७४, जळकोट ७३६, अहमदपूर २७८ तर चाकूर तालुक्यातील ६७३ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान...जिल्ह्यात जिरायती क्षेत्रावरील ९५८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर १७३५ हेक्टरवरील बागायती व ५७० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत ३७६२ जिरायती, ४४१ बागायती तर २५३ हेक्टरवरील फळपिकांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अद्यापही १० हजार ९३३ शेतकऱ्यांचे ७ हजार ४३४ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.