देवणी तालुक्यात बुधवारी वातावरणात बदल होऊन सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारीसह अन्य पिके भुईसपाट झाली आहे. जवळपास तीन तास पाऊस झाला. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके भुईसपाट झाले. सध्या या भागात ऊसाची तोडणी सुरु असून पावसामुळे शेतात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीच्या कामात व्यत्यय आला आहे.
तालुक्यात पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबुज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड झाली आहे. या पावसामुळे सरीत पाणी थांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. तसेच तुरीची कापणी करुन काही शेतक-यांनी शेतावर टाकली आहे. मात्र, पावसामुळे हे पीक पाण्यात गेले आहे. तसेच हरभ-यात पाणी साचल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
टरबुज, खरबुजास फटका...
सध्या मुबलक पाणी असल्याने दोन एकर क्षेत्रावर टरबुज आणि एक एकरवर खरबुजासह केळी, कोंथिबीरची लागवड केली आहे. बुधवारच्या पावसामुळे खरबुजाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अति पाण्यामुळे या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे, असे येथील शेतकरी सुरेंद्र आंबुलगे यांनी सांगितले.
पुन्हा शेतक-यांवर संकट...
वादळी वा-यासह पाऊस झाल्याने ज्वारी भुईसपाट झाली आहे. तसेच कापणी केलेल्या तुरीच्या पिकात पाणी साचले आहे. हरभ-याच्या पिकात पाणी साचल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतक-यांवर पुन्हा संकट आले आहे, असे बटनपूर येथील शेतकरी संभाजी पाटील यांनी सांगितले.