लातूर : ‘एएमबीआयएस’ प्रणालीच्या वापरामुळे गत वर्षभरात तब्बल बारा गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. परिणामी, अंगुलीमुद्रा शाखेकडून गुन्ह्यांची उकल करण्याला, तपासाला गती मिळाली आहे.
लातूर पाेलिस दलात २००४ पासून अंगुलीमुद्रा शाखा सुरू करण्यात आली असून, तेव्हापासून पारंपरिक पद्धतीने आराेपींच्या बाेटांचे ठसे कागदावर घेत ते कागद सांभाळून ठेवण्याची पद्धत हाेती. कालांतराने यात आधुनिकीकरण झाले. ‘ऑटाेमेटेड मल्टी माॅडल बायाेमॅट्रिक अडेंटीफिकेशन सिस्टीम’ ही संगणकीय प्रणाली उदयास झाली. याच्या माध्यमातून २०२३ मध्ये लातुरात गंभीर गुन्ह्यांचे, घरफाेडी, दराेड्याच्या एकूण १२ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
गुन्ह्यांच्या दाेषसिद्धी प्रमाणात झाली वाढ...ही प्रणाली प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून, पाेलिसांनी आधुनिकीकरणाची कास धरली आहे. केवळ बाेटांचे ठसेच नाही तर तळवे, चेहारा आणि डाेळे स्कॅन करून ते डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवले जात आहेत. राज्यातील सर्वच पाेलिस घटकांकडून याचा आता वापर केला जात आहे. गुन्ह्यांची झटपट उकल झाल्याने दाेषसिद्धीचे प्रमाण वाढले आहे.
२०२१ मध्ये सुरू झाला प्रायाेगिक तत्त्वावर वापर...महाराष्ट्रात मार्च २०२१ मध्ये प्रायाेगिक तत्त्वावर प्रणालीचा वापर सुरू झाला. यात लातूरची निवड केली असून, मे २०२२ पासून राज्यत ही प्रणाली सुरू झाली. पूर्वी गुन्हेगारांच्या बाेटांच्या ठशावरून आराेपीची ओळख पटवली जायची. आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा, फाेटाेवरून गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येत आहे. या प्रणालीत आराेपींच्या अंगुलीमुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा, डाेळ्यांची बुबळे हे डिजिटल स्वरूपात जतन करून ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे.
लातूर जिल्ह्यामधील २३ ठाण्यांत प्रणाली सुरू...लातुरात २३ ठाण्यांसह अंगुलीमुद्रा केंद्रात या प्रणालीचे हार्डवेअर, साॅफ्टवेअर दिले आहे. ठाण्यात अटक आराेपींच्या अंगुलीमुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नाेंदणी करून त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वेतिहास तपासण्यासाठी, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी या प्रणालीचा वापर हाेत आहे. गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिंटद्वारे गुन्हेगारांचा शाेध घेणे काही क्षणात शक्यत हाेत आहे.
तब्बल १४ हजार १२४ गुन्हेगारांचा डाटा फिडिंग...लातुरात सुरू झालेल्या ‘एएमबीआयएस’ प्रणालीवर २०२१ पासून मेअखेरपर्यंत १ हजार १२८ प्रकरणांत अटक केलेल्या आराेपींवर पूर्वीपासून दाखल असलेल्या गुन्ह्यांचा शाेध घेण्यात आला. तर विविध गुन्ह्यांमधील १४ हजार १२४ गुन्हेगारांचा डाटा फिडिंग करण्यात आला आहे.