- आशपाक पठाणलातूर : इस्लाममध्ये रमजान महिन्यात रोजे (उपवास) केले जातात. यासाठी पहाटेच्या ५ पूर्वी सहेरी करावी लागते. मात्र, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी, रूग्णालयात उपचारासाठी असलेले नातेवाईक यांची गैरसोय होणार नाही, यासाठी लातूर शहरातील उस्मानपुरा येथील युवकांनी एकत्रित येऊन घरपोच सेवा सुरू केली आहे. यासाठी शंभराहून अधिक स्वयंसेवक सेवा देत असून शहरात ४००जणांना घरपोच डबा दिला जात आहे.
पवित्र रमजान महिन्यात जास्तीत जास्त पुण्य कमविण्यासाठी सर्वजण धडपड करतात. लातूर शहरात शिक्षणासाठी हॉस्टेल, भाड्याने रूम करून राहणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रोजे करणार्या विद्यार्थ्यांना सहेरची व्यवस्था व्हावी, यासाठी उस्मानपुरा येथील युवकांनी एकत्रित येऊन सेवा म्हणून टेक मस्जिद येथून घरपोच डबा देण्याचे काम हाती घेतले आहे. रात्री १२ वाजल्यापासून हे तरूण स्वयंपाकांच्या तयारीला लागतात. शहराच्या वेगवेगळ्या कानाकोपर्यात असलेल्या विद्यार्थी, नागरिक, रूग्णांचे नातेवाईक यांना फोन करून त्यांच्या घरीच अत्यंत ताजे जेवण दिले जात आहे. विशेष म्हणजे यासाठी या भागातील महिला उत्स्फुर्तपणे आपापल्या घरातून भाकरी तयार करून घेतात.
सेवा हाच एकमेव उद्देश...
उस्मानपुरा येथील टेक मस्जिद येथे सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास जवळपास ५० तरूण डबे भरण्याचे काम करीत होते. काेणी भाजी, कोणी भात तर कोणी घाईघाईतच अरे त्या डब्यात खजूर टाकायच्या राहिल्यात अशी आठवणही करून देत होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सर्वचजण हाती पडेल ते काम करीत होते. आपापले मार्ग ठरवून घेतलेले असल्याने कोणत्या मार्गावर किती डबे आहेत, सर्वांचे मोबाईल नंबर घेऊन स्वयंसेवक दारात गेल्यावर फोन करून संबंधितांना बोलावून हाती डबा ठेवून पुढे जातात, यासाठी कुठलाही मोबदला घेतला जात नाही, फक्त सेवा हाच उद्देश असल्याचे तरूणांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
घरातून येतात गरमागरम भाकरी...टेक मस्जिदमधून जवळपास ५०० जणांची सहेरची व्यवस्था केली जात आहे. मस्जिदमध्ये भाजी, भात बनवला जातो. तर स्वयंसेवक व परिसरातील घरातून महिला गरमागरम भाकरी तयार करून देतात. विशेष म्हणजे त्या मस्जिदमध्ये पोहोच केल्या जातात. एखाद्यावेळी कमी जास्तीचा अंदाज आला आणि सूचना केली तात्काळ भाकरी आणून दिल्या जातात. सध्या ८०० ते १००० भाकरी लागत असल्याचे सांगण्यात आले.
गरजूंनी संपर्क करावा, घरपोच सेवा...
लातूर शहरातील शासकीय रूग्णालय, एमआयटी मेडीकल कॉलेज तसेच अन्य खाजगी रूग्णलय, खाजगी कोचिंग क्लासेचा भाग, बार्शी रोडवर वसवाडी, नांदेड नाका आदी भागात सेवा देत आहेत. ज्यांची सोय नाही, त्यांनी टेक मस्जिदमध्ये संपर्क करावा, घरपोच सेवा दिली जाईल, असे तरूणांनी सांगितले.