चाकूर : तालुक्यात ३९ शाळा सुरू झाल्या असून, ७२ टक्के शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती आहे.
चाकुरात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांच्या शिक्षकांची संख्या १ हजार १६८ इतकी असून, ३१९ शिक्षकांचा दुसरा लसीकरणाचा डोस शिल्लक आहे. वडवळ नागनाथ, नळेगाव, वडगाव, घारोळा, कडमुळी, आंबूलगा, डोंग्रज, नांदगाव, तिवघाळ, अजनसोंडा खू. येथील शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ८ वी ते १० वीची विद्यार्थी संख्या ३०६ आहे. यातील १२३ विद्यार्थी उपस्थित आहेत. खाजगी माध्यमिकच्या ५५ शाळा असून, ३९ शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वीची विद्यार्थी संख्या ७ हजार ४९२ आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती मात्र ५ हजार ४०३ आहे. खाजगी शाळांचे ६२८ शिक्षक असून, ४९९ शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर जिल्हा परिषदेची शिक्षक संख्या ५४० असून, ३५० शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत.
शाळा - ६८
दोन डोस घेतलेले शिक्षक - ८४९
पहिला डोस घेतलेले शिक्षक - ३१९
जि.प. माध्यमिक शाळेत १२३ विद्यार्थ्यांची उपस्थिती...
चाकूर तालुक्यात जिल्हा परिषदेची माध्यमिक विद्यार्थी संख्या ३०६ असून, उपस्थिती केवळ १२३ विद्यार्थ्यांची आहे. सद्य:स्थितीत ५ हजार ४०३ विद्यार्थ्यांची उपस्थिती असून, ७२ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर खाजगी शाळांचे ६२८ शिक्षक असून, त्यापैकी ४९९ शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. चाकूर शहरात जिल्हा परिषदेची ८ वी ते १० वीपर्यंतची मुलांची आणि मुलींची शाळा आहे. शाळा सुरू करण्यासाठी नगर पंचायतीकडे शासनाच्या आदेशानुसार परवानगी मागण्यात आली. त्यांनी परवानगी दिली नसल्याने आम्ही शाळा सुरू करू शकलो नसल्याचे मुख्याध्यापक ज्ञानोबा बने यांनी सांगितले.
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू...
शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी मात्र कमी येत आहेत. शिकवणी सुरू झाली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. त्यांचा अभ्यासक्रम मागे राहता कामा नये. नियमांचे पालन केले जात आहे.
- गोपाळ एनकफळे, शिक्षक
शाळेत विद्यार्थी येताच त्यांची ऑक्सिजन पातळी, ताप तपासणी केली जाते. मास्कचा वापर सक्तीने केला जातो. वर्गात प्रवेश करताना सॅनिटायझर केले जाते. परंतु विद्यार्थी संख्या कमी आहे. ती वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
- नागनाथ स्वामी, शिक्षक
लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० शिक्षक पाठविण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्या आहेत. ऑफलाइन शिकवणीत काही अडचण नाही. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
- संजय आलमले, गटशिक्षणाधिकारी