लातूर : मागील एक आठवड्यापासून शासनाकडून आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. माहे सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव परत वाढण्याची शक्यता शासनाकडून यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात ३५ टक्के लसीकरण झाले आहे.
दि. १ सप्टेंबर २०२१पर्यंत लातूर शहरातील १८ वर्षे वयोगटापुढील अपेक्षित ३,४८,८२६ लाभार्थींपैकी १,२५,२६९ अर्थात ३५.९१ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे तर ५६,७७५ नागरिकांनी अर्थात १६.४७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. शहरातील २,२३,५५७ नागरिकांनी अदयाप त्यांचा पहिला डोस घेतलेला नाही. सद्यस्थितीत लस नियमितपणे उपलब्ध होत आहे. शहरामध्ये मनपामार्फत एकूण १५ ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र चालू आहेत तसेच प्रभागनिहायदेखील लसीकरण केंद्राचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची नियमितपणे माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे. सध्या नियमितपणे लस उपलब्ध होत असल्याने ज्या नागरिकांनी अदयाप एकही डोस घेतलेला नाही, त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी लवकरात लवकर कोविड १९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घ्यावा व ज्यांनी पहिला डोस घेऊन विहीत कालावधी पूर्ण झालेला आहे, त्यांनी नजीकच्या कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण केंद्र येथे जाऊन त्यांचा दुसरा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.