मागील दोन दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे या लसीचा फक्त दुसरा डोस दिला जात आहे. यापूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा होता. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच लसीचा दुसरा डोस दिला जात होता. पहिल्या डोससाठी वेटिंग होती. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले होते. पुन्हा त्यात बदल करून ४५ वर्षांपुढील सर्वच व्यक्तींना लस दिली जात होती. आता पुन्हा त्यात बदल झाला आहे. १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जात आहे; परंतु तुटवडा असल्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेताच घरी परतावे लागत आहे.
२० हजार डोस उपलब्ध
गेल्या दोन दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा तुटवडा होता; परंतु मंगळवारी २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नियुक्त सर्वच लसीकरण केंद्रांवर नियमित लसीकरण होईल. कोव्हॅक्सिन लसही उपलब्ध आहे. नागरिकांनी संबंधित लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
लस घेतली तरी मॅसेज
लस घेतल्यानंतर कोविन पोर्टलवरून आपला पहिला डोस झाला आहे. दुसऱ्या डोसची तारीखही आहे, असा मॅसेज येतो. दोन्हीही डोस घेतले असताना तुमचे व्हॅक्सिनेशन पूर्ण झाले असल्याचा मॅसेज येतो. त्यानंतर काही दिवसांनी आपला दुसरा डोस राहिलेला असून, लस घेण्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी, असा मॅसेज येत आहे. कोविनचे हे पोर्टलही अपडेट होत नसल्याने नागरिकांना असे मॅसेज येत आहेत.