लातूर : भादा पाेलिस ठाण्यातील दाेघा पाेलिस कर्मचाऱ्यांनी शिंदाळा येथील कला केंद्रालगत असलेल्या दुचाकींची ताेडफाेड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणाची जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी साेमवारी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी सहायक पाेलिस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे आणि पाेलिस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे या दाेघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
औसा तालुक्यातील भादा ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पाेलिस कर्मचाऱ्यांच्या प्रतापाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये सहायक पाेलिस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे आणि पाेलिस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे हे दाेन कर्मचारी शिंदाळा लाे. (ता. औसा) येथील कलाकेंद्रालगत कारमधून उतरतात आणि पार्किंग केलेल्या इतर दुचाकींची मोडतोड करतात. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ साेशल मीडियात व्हायरल झाला. औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा येथील २० डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीचा असल्याचे चाैकशीत समाेर आले.
चाैकशीनंतर केली कारवाई...व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिले हाेते. दाेन दिवसांच्या चाैकशीनंतर व्हायरल व्हिडिओत दिसणारे सहायक पाेलिस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे, पाेलिस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर