लोकमत न्यूज नेटवर्क , लातूर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे सर्वच राजकीय पक्ष जातीपुरते मर्यादित आहेत. त्यांना आपला पक्ष सार्वत्रिक करण्याची संधी असल्याने त्यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
लातुरात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचल्यानंतर त्यांची सभा झाली. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक दरी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या जातीपुरते मर्यादित आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत. जरांगे यांच्या समर्थनार्थ अथवा विराेधात भूमिका घेत नाहीत अशी टीका त्यांनी केली.