संदीप शिंदे, अहमदपूर (जि.लातूर) : लवकरच इथेनॉलवर धावणारी वाहने बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे इथेनॉलला प्रचंड मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी. ज्यामुळे ऊसाला अधिकचा भाव देणे शक्य होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल आणि तो अन्नदात्याबरोबरच उर्जादाताही होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवारी केले.
अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व तीन महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, वीरमठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर-लातूर-रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास ३० हजार कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांना महामार्गाने जोडले आहे. तसेच तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे.
हेलिकॉप्टरमधून पाहिले, सर्व नद्या कोरड्या...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपण हेलिकॉप्टरने येताना सर्व नद्या कोरड्या असल्याचे पाहिले. तिथे पाणी अडविण्याचे काम व्हायला हवे होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या कारखाना व्यवस्थापनांनी जलसंधारणाची कामे हाती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कारखानदारी यशस्वी होईल आणि पाणीपातळीही वाढेल. नागरीकांसह लोकप्रतिनीधींनी प्रथम पाण्याला पसंती द्यावी आणि जलसंधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे. आमच्या विभागाने या कामातून १८.७२ क्युबिक मीटर पाण्याचा साठा होईल, असे काम केले आहे. लातूर-टेंभूर्णी मार्गाच्या कामातील अडचणी दुर होत आहेत. हे काम लवकरच पुर्ण होईल, असेही ते म्हणाले.