खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान, शेतातील उभ्या सोयाबीनला मोड फुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात यंदा मृगात पाऊस झाल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही चांगली बहरली होती. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा होती. परंतु, सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून सतत पाऊस होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे.
खंडाळी व परिसरातील नागझरी, उजना, ढाळेगाव, धसवाडी, सुमठाना, नाईकनगर, मावलगाव, आदी गावांतील सोयाबीन काढणीसाठी आले आहे. परंतु, पिकांत पाणी असल्याने काढणीसाठी मजूर धजावत नाहीत. अशा परिस्थितीत उभ्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन काढणीला ब्रेक लागला आहे. तसेच कापसाची बोंडे गळत आहेत. तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.