लातूर : देवणी तालुक्यातील वलांडी शुक्रवारी रात्री ११ वा., ११.३५ वा. च्या सुमारास आणि रविवारी पहाटे २.३५ वा. व २.४५ वा. च्या सुमारास गुढ आवाजासह जमीन हादरली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हे भूकंपांचे अति सौम्य धक्के असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.
निलंगा तालुक्यातील हासोरी व परिसरात गेल्या महिन्यापासून गुढ आवाज होऊन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. निलंगा तालुक्यास जोडून असलेल्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे शुक्रवारी रात्री दोनदा आणि रविवारी पहाटे दोनदा गुढ आवाजास जमीन हादरली. त्यामुळे पहाटेच्या वेळी नागरिक रस्त्यावर येऊन भूकंप झाला की काय, अशी चर्चा करीत होते. विशेष म्हणजे, वलांडी परिसरातील अन्य गावात अशा प्रकारचा कुठलाही आवाज अथवा धक्का जाणवला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने वलांडी येथे येऊन पाहणी करावी, अशी मागणी सरपंच राणीताई भंडारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.नागरिकांनी घाबरु नये...
वलांडीस जाणवलेले धक्के हे अति सौम्य भूकंपाचे धक्के आहेत. ते एक रिश्टर स्केलपेक्षा कमी तीव्रतेचे असल्याने त्याची भूकंपमापन केंद्रावर नोंद दिसत नाही, असे वरिष्ठांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. - सुरेश घोळवे, तहसीलदार.
ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी..या गुढ आवाजाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने मोडकळीस आलेली घरे पाडण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस द्यावी. तसेच खुल्या जागेतील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, घरातील वस्तूंची मांडणी ही डोक्यावर कोणतीही वस्तू पडणार नाहीत या दृष्टीने करावी, असे आवाहन महसूल प्रशासन व ग्रामपंचायतीने केले आहे.