लातूर : औसा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर ग्रामीण या तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत दावे-प्रतिदावे होत असून, अनेकांनी बंडाचा झेंडा उचलला आहे. दोन दिवसांत बंड थंड होते की, निवडणूक रिंगणात रणकंदन घडते, याकडे लक्ष लागले आहे.औसा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बुधवारी कार्यकर्ते लातूर-औसा रस्त्यावर आले. याच मार्गावरून निलंग्याकडे निघालेले पालकमंत्री संभाजी पाटील यांची गाडी अडविण्यात आली. अहमदपूर मतदारसंघात भाजपाकडून आ. विनायकराव पाटील यांना उमेदवारी मिळल्यामुळे पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. तसेच भाजपाचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर मनसेतून भाजपात दाखल झालेले बालाजी पाटील चाकूरकर हेही बंडाच्या पवित्र्यात आहेत.उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. दोनवेळा निवडून आलेले आ. सुधाकर भालेराव यांना अजूनही उमेदवारी का दिली नाही, असा सवाल करीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली.
Vidhan sabha 2019 : लातुरात उमेदवारीवरून रणकंदन! औश्यात पालकमंत्र्यांची गाडी अडविली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:07 AM