लातूर : विलासराव देशमुख हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांच्यामुळे लातूरचा लौकिक देशभर झाला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या धाडसी निर्णयाने आणि साहसी नेतृत्वामुळे महाराष्ट्राला पुढे नेले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. शनिवार दि. १५ रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर पालकमंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, खा. अशोक चव्हाण, खा. सुनील गायकवाड, आ. दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबकनाना भिसे, वैशालीताई देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, माजी मंत्री सतेज पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ़बस्वराज पाटील, माजी़ आ़ वैजनाथ शिंदे, माजी खा़डॉग़ोपाळराव पाटील, खा. रविंद्र गायकवाड, आ़ सतीश चव्हाण, आ़ विक्रम काळे, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, महापौर अख्तर शेख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, उल्हासदादा पवार, अर्चनाताई पाटील चाकूरकर, धीरज देशमुख, जेनेलिया देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी पवारांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर पवार पुढे म्हणाले की, विलासराव हे संकटांना धैर्याने सामोरे जाणारे नेतृत्व होते. लातूर भूकंपाच्या वेळी मी स्वत: त्यांना पाहिले आहे. ते सर्वसामान्यांचे हित जपणारे ते आदर्श मंत्री होते. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आदर्श घालून दिला आहे़ त्यांचा आदर्श या पुतळ्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील नेत्यांना नेहमीच मिळत राहणार आहे़ विलासराव हे उत्कृष्ट मित्र होते. देशमुख आणि मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से आम्ही ऐकले असल्याचे त्यांनी सांगितले़माजी केंद्रीय मंत्री चाकूरकर यांनीही यावेळी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि त्यांचे संबंध भावांप्रमाणे असल्याचे सांगत ते म्हणाले की, ते हिम्मतवाला आणि निधड्या छातीचे राजकारणी होते. मी विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या आठ निवडणुका लढलो. शेवटची एकच लोकसभा निवडणूक लढलो तेव्हा मला विलासरावांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मते होती. आता नवी पिढी राजकारण करते आहे. सुप्रिया, पंकजा आणि अमित हे आपल्या पित्यांच्या दोन पावले पुढचे राजकारण करतील, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी दोघांच्या आवाजाची नक्कल करुन हुबेहूब जुगलबंदीचे चित्र डोळ्यापुढे उभे केले. राजकारण केवळ निवडणुकापुरतेच ठेवायचे त्यानंतर मात्र ते गुंडाळून ठेवावे. केवळ समाजकारण करावे ही शिकवण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिली़ त्यांनी एकमेकांचे वाईट व्हावे, असे राजकारण कधी केले नाही़ देशमुख व मुंडे कुटुंबाची मैत्री कायम राहावी, ही जनतेची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या़यावेळी खा. सुनील गायकवाड आणि आ. अमित देशमुख यांचीही मनोगते झाली. प्रारंभी जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड व अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार अण्णासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोघांच्या एकमेकांवरील टोलेबाजीची रंगत यावेळी पवार विरुद्ध पंकजा या रुपाने मिळते का ? याची उत्सुकता लातूरकरांना होती. सुरुवातीला बोलताना पंकजा यांनी चित्रपटक्षेत्रातील स्टेटस् असणारे अभिनेते दिलीपकुमार जसे आहेत, तसे राजकारणातील शरद पवार हे दिलीपकुमार असल्याचे सांगितले. यावर पवार यांनी भाषण करताना, मी चित्रपट पहात नाही, मला त्याची आवडही नाही. परंतु पंकजाने माझा उल्लेख दिलीपकुमार असा का केला हे मला कळाले नाही. म्हणून मी सुद्धा त्यांना एका नायिकेची उपमा द्यायची ठरविले. यासाठी स्टेजवर असतानाच रितेशला आघाडीची नायिका कोण हे विचारले ? त्याने माधुरी दीक्षितचे नाव सांगितले. पण मी आत्ताच्या पिढीची नायिका कोण ? असे पुन्हा विचारले. त्याने दीपिका पदुकोण हे नाव सांगितले. त्यामुळे पंकजाचा उल्लेख मी दीपिका पदुकोण म्हणून करतो, असे म्हणून ‘मुंडेंना कोपरखळी मारली.
विलासरावांनी महाराष्ट्र पुढे नेला - शरद पवार
By admin | Published: August 17, 2015 12:54 AM