लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यात मोठ्या शहरांसाठी लांब, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही एस. टी. बसचे दर्शन दुर्लभ आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रवाशांना तालुक्याला कामानिमित्ताने जावे लागत आहे. यावेळी वाहतुकीसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करत असून, भाड्याची दुप्पट आकारणी करत असल्याने प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
अहमदपूर आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने अनेक प्रवाशांना रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तालुक्यासह दुसऱ्या जिल्ह्यात एस. टी.ची प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी ग्रामीण भागात काही गावांना अजूनही बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अनेक बसगाड्या आगारातच उभ्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही फेऱ्या बंद असल्याचे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे एस. टी. बसेस बंद असल्याने प्रवासी मात्र खासगी वाहनांतून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आगारातील एकूण बस ७७
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या ३९२
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या ३४०
खेडेगावात जाण्यासाठी टमटम, रिक्षाचा आधार...
राणी सावरगाव, गौंडगाव, वागदरी, ढोर सांगवी, हनमंत जवळगा, तांबट सांगवी, विळेगाव, लांजी, घोटका, लिंबोटी, ढोलदरी तांडा, मावलगाव, वैरागड, ढाळेगाव, खंडाळी आदी भागात बसेस सोडलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना बसेस बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
दरदिवशी २२ हजार किलोमीटरचा प्रवास
१ ) एस. टी. महामंडळाकडून सोडल्या जात असलेल्या गाड्यांचा गत अडीच महिन्यांतील प्रवास दरदिवसाला २२ हजार किलोमीटर होत आहे.
२ ) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाला २ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
३ ) शहरी भागात एस. टी. बसेस धावत असल्या तरी ग्रामीण भागातील भुतेकरवाडी, येलदरी, कारेपूर, जळकोट, शिवणखेड, हिंगणगाव, मोळवण, पिंपळदरी, रायवाडी, झरी, नागठाणा येथीलच ग्रामीण फेऱ्या सुरु असून, उर्वरित फेऱ्या बंद आहेत.
ग्रामीण भागातून सुरुवातीला एस. टी. बसफेऱ्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एस. टी. बसची वाहतूक सुरू केली जाईल. नागरिकांनी एस. टी.चा प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करावे. - एस. जी. सोनवणे, आगारप्रमुख
खेडेगावांवरच अन्याय का ?
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरानंतर ग्रामीण भागातही एस. टी. बस सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे या बसेस बंद करण्यात आल्या. आगारामधून ग्रामीण भागातील अनेक खेडेगावांत बस अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
- गणपतराव संपते, प्रवासी
कोरोना संसर्गामुळे अनेक महिने बसेस बंद होत्या, आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. परंतु, आजही ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये बसेस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले, तरी प्रवाशांचे हाल होत आहेत.
- गजानन आनंतवाळ, प्रवासी