ज्येष्ठांच्या विरंगुळा कक्षासाठी गावातील वापरात नसलेल्या इमारतीची निवड करून १ ऑक्टोबरपर्यंत त्याची स्वच्छता करून आकर्षक रंगरंगोटी करून घ्यावी. कक्षात पिण्याचे पाणी, विद्युत, बसण्याच्या सुविधेबरोबर दूरचित्रवाणी संच, पुस्तके, वृत्तपत्रे, भजनी साहित्य आदी उपलब्ध करावे. तसेच लोकसहभाग अथवा ग्रामपंचायतीच्या निधीतून काठी, चष्मा, श्रवणयंत्र अशा आवश्यक साहित्याचे वाटप करावे.
गावातील ज्येष्ठांच्या मदतीसाठी युवकांचे सारथी पथक नियुक्त करावे. या पथकामार्फत एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक व आरोग्य विषयक गरजा असलेल्यांची निवड करून त्यांना मदत द्यावी. या कामासाठी सेवाभावी संस्थांचीही मदत घ्यावी, अशा सूचना सीईओ गोयल यांनी केल्या आहेत.
गावागावांत आरोग्य शिबिर घ्यावे...
ज्येष्ठ नागरिक दिनी गावातील ज्येष्ठांसाठी शासकीय अथवा खासगी डॉक्टरांच्या मदतीने गावात आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठांची निवड करून त्यांना ग्रामीण अथवा शासकीय रुग्णालयात आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवेसाठी पाठवावे. तसेच या दिवशी ज्येष्ठांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी दिली.
गावनिहाय अधिकारी नियुक्त...
या उपक्रमांसाठी प्रत्येक गावांसाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावेत. १ व २ ऑक्टोबर या कालावधीत पंचायत समिती स्तरावर कुठल्याही बैठका आयोजित करण्यात येऊ नयेत. पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी गावात थांबून विविध उपक्रमात सहभागी व्हावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.