बोरगाव काळे (जि. लातूर) : येथील लातूर-मुरुड मार्गावर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरणच्या विरोधात बुधवारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बोरगाव काळे येथे मागील काही दिवसांपासून राेहित्र जळाले आहे. त्यामुळे कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत असून, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच महावितरण शेतीसाठी आकारण्यात आलेल्या वीजबिलाचा हिशेब देण्यास तयार नाही. केवळ शेतीपंपाचे वीजबिल भरण्यास सांगितले जात असून, हिशोब मागितल्यास वरिष्ठांना बोला असे सांगितले जात आहे. यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे, तालुकाध्यक्ष दादासाहेब पवार, राहुल काळे, गणेश डोंगरे, संदीपान फोलाने, सूर्यकांत सोनवणे, प्रवीण देशमुख, सचिन भिसे, निळकंठ काळे, भगीरथ काळे, अजित काळे, काकासाहेब साखरे, बाळू माळी, प्रशांत साखरे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
पोलिसांची धरपकड, एक कि.मी. चालत प्रवास...महावितरणचे अधिकारी, पोलीस, शेतकरी यांच्यात आंदोलनाच्या आधी चर्चा झाली. मात्र, तोडगा निघाला नसल्याने अखेर आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. रखरखत्या उन्हात रस्त्यावर बैलगाड्या सोडून आंदोलनकर्ते मुरुड-लातूर महामार्गावर बसले होते. मुरुडचे सपोनि. धनंजय ढोणे हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी पोलिसांना धरपकड करावी लागल्याने आंदोलनकर्ते पोलीस स्टेशनला येण्यास तयार झाले. मात्र, पोलिसांच्या गाडीत न येता आम्ही सर्व चालत येऊ असे म्हणत आंदोलनकर्ते एक कि.मी. चालत गेले.