उदगीर : शहर पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभाग लातूर यांच्या संयुक्त कारवाईत शहरातील वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर गुरुवारी कारवाई करीत ३ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
उदगीर शहर व ग्रामीण भागातील वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी व त्यांनी वाहतुकीचे नियमाचे पालन करावे या उद्देशाने उदगीर शहर पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभाग लातूर यांच्या पथकाने गुरुवारी विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ऑटोचालक मालक, परवाना, परमिट, विमा, बॅच नंबर, वाहनाची कागदपत्रे व गणवेश आदी बाबींची तपासणी करून ५४ ऑटो रिक्षाचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एकूण ३ लाख ७० हजार रुपये इतका दंड करण्यात आला.
या कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभाग लातूर येथील निरीक्षक सुनील खंडागळे, शीतल गोसावी, अमोल सोमदे, स्वप्निल राजुरकर, शहर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित कुदळे, गजानन काळे, पुंडलिक मोहिते, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी अक्षय पाटील, अंमलदार मोतीपवळे, शिवपुजे, फुलारी यांनी कारवाईमध्ये सहभाग नोंदवला होता.