ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 04 - इयत्ता बारावीचा राज्यशास्त्राचा पेपर शनिवारी देवणी तालुक्यातील धनेगाव येथील परीक्षा केंद्रातून व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
निलंगा तालुक्यातील कोतलशिवणी येथील परीक्षा केंद्रातून गेल्या मंगळवारी इंग्रजीची प्रश्नपत्रिका दोन मिनीटात बाहेर आल्याचा प्रकार घडला होता़ त्यानंतर पुन्हा राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिकाच चक्क व्हॉटस्अॅपवरच व्हायरल झाल्यामुळे जिल्हाभरात पेपर फुटल्याची चर्चा आहे़ या प्रकाराने लातूरचे शैक्षणिक वर्तूळ हादरून गेले आहे़
केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या अनेक पालकांना पेपर फुटल्याचा संशय असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही संतप्त पालकांनी यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडे केली़ शनिवारी इयत्ता बारावीचा राज्यशास्त्राचा पेपर होता़ देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रातून राज्यशास्त्राचा पेपर अवघ्या १० मिनीटात व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्याने परीक्षार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली़ केवळ दहा मिनीटात हा पेपर व्हायरल झाल्याने परीक्षा केंद्र परिसरासह जिल्हाभरात पेपर फुटल्याची चर्चा आहे.
आरोपीत केद्रसंचालकांसह विद्यार्थिनी, सेवक आणि पर्यवेक्षक
देवणीचे गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सेवक सतिश रावसाहेब बिरादार, पर्यवेक्षक बी़एम़ होनराव, केंद्रसंचालक आऱव्ही़ कांबळे यांच्यासह विद्यार्थीनी विरोधात देवणी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणी वाटप करणाºया मुलाने केला पेपर व्हायरल
४ महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा काळात हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाºया मुलाने ही प्रश्नपत्रिका १० मिनीटात व्हॉटस्अॅपवर व्हायरल करून फोडल्याचा संशय आहे़ या मुलाचीही पोलिसांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडून चौकशी सुरू आहे.