औराद शहाजानी : परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली असून, दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम बाजार समितीत शेतमालाच्या आवकवर झाला असून, महिन्यात सरासरी ८५०क्विंटल राहणारी मुगाची आवक केवळ ५८ क्विंटलवर पोहचली आहे. त्यामुळे शेतकरी शेतमाल विक्रीस प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यावर्षी पावसाची ऑगस्ट महिन्यातील नोंद ही गत ५० वर्षांतील सर्वांत निचांकी २९ मि.मी. औराद हवामान केंद्रावर झाली आहे. एक महिन्यात पावसात खंड पडल्याने खरीप पिके पाण्याअभावी सुकली आहेत. मुग हे खरीप पिक कमी कालावधीत येणारे आहे. ऑगस्ट महिन्यात मुगाच्या राशी सुरु असतात. मात्र, यावर्षी पाऊस नसल्याने मुगाच्या पिकावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले असून, औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी ऑगस्ट महिन्यात केवळ ५८ क्विंटल मुगाची आवक झाली आहे. दरही मागील वर्षापेक्षा जास्त आहेत. यावर्षी सुरुवातीला ९१०० रुपये दर होता. हाच दर आवक घटल्याने मंगळवारी १० हजार रुपयांवर पोहचला आहे.
मागील पाच वर्षात औराद समितीमध्ये मुगाची चांगली आवक होत होती. यामध्ये २०१९ मध्ये ऑगस्ट महिन्यात ११४५ क्विंटलची आवक झाली त्यास ७१५१ रुपयांचा दर होता. २०२० मध्ये ८५८ क्विंटल आवक, ५९०० दर, २०२१ मध्ये ८५५ क्विंटल आवक तर दर ५९५१ होता. २०२२ मध्ये ३५० क्विंटल आवक, दर ६१५० तर २०२३ च्या ऑगस्टमध्ये आवक केवळ ५८ क्विंटलची आवक झाली असून, त्यास सर्वाधिक १० हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. दर वधारले असले तरी आवक २० पटीने कमी झाली आहे.
पावसाअभावी शेतमालाची आवक घटली...औराद शहाजानी येथील बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत मुगाची सर्वाधिक कमी आवक या ऑगस्ट महिन्यात झाली आहे. पावसाची उघडीप असल्याने बाजार थंडावला असल्याचे बाजार समितीचे सचिव सतिश मरगणे यांनी सांगितले. तर मुगाचे उत्पादन घटले असून, पेराही कमी आहे. पाऊस नसल्याने सर्वच शेतमालाची आवक कमी होणार आहे. पाण्याअभावी शेतातील पिके वाळून जात असून, शेतकरी शेतमाल विक्रीस आणण्यास प्रतिसाद देत नसल्याचे आडत व्यापारी अशोक थेटे यांनी सांगितले.