किल्लारी (जि. लातूर) : विशिष्ट पक्षाला मतदान करावे, असे सांगत पैसे वाटप केल्याच्या आराेपावरुन किल्लारी पाेलिस ठाण्यात चाैघांवर गुन्हा दाखल झाल्याचे पाेलिसांनी मंगळवारी सांगितले.
उस्मानाबाद लाेकसभा मतदारसंघ क्षेत्रात व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रामेगाव येथे हा प्रकार घडला असून, तक्रारीत घड्याळाला मतदान करण्यासाठी पैसे वाटल्याचा उल्लेख आहे. पाेलिसांनी सांगितले, उस्मानाबाद लाेकसभा मतदारसंघासाठी ७ मे राेजी मतदान झाले. त्याच्या पूर्वसंध्येला रामेगाव येथील तनुजा विनाेद शेळके, इंदुबाई बालाजी गुंजेटे, बालाजी गुंजेटे (रा. रामेगाव) आणि प्रशांत डाेके (रा. खराेसा) यांनी विशिष्ट पक्षाला मतदान करावे म्हणून गावातील काही जणांना पैसे वाटप केले. हा प्रकार साेमवारी रात्री घडला. याबाबत किल्लारी येथील कृषी मंडळ अधिकारी अशाेक पिनाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पाेलिस ठाण्यात लाेकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचा तपास पाेलिस हवालदार उत्सुर्गे करीत आहेत.
निवडणुकीचे काम करताना सात जणांकडून मारहाण...मतदानासाठी पैसे वाटल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर परस्परविराेधी तक्रार दाखल झाली आहे. त्यात फिर्यादी प्रशांत डाेके यांनी म्हटले आहे, निवडणुकीचे काम करताना सात जणांनी मारहाण केली. शिवाजी यशवंत पाटील, शरद युद्धवीर पाटील, विलास दादाराव शेळके, बाबुराव शिवाजी शेळके, लक्ष्मण भगवान शेळके, नवनाथ गंगाधर भारती, गाेविंद बालाजी शेळके (सर्व रा. रामेगाव) यांनी फिर्यादी डाेके यांना तू इथे का आलास? असे म्हणून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील साेन्याची अंगठी, लाॅकेट व खिशातील ३२ हजार हिसकावून घेत कारचे नुकसान केले. याबाबत आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल असून, पाेलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.