लातूर : चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देतो असे आश्वासन मतदानादिवशी देऊन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसने केली आहे. दरम्यान, दुपारनंतर बहिष्कार मागे घेतलेल्या आनंदवाडीत रात्री १०.३० नंतरही मतदान सुरू होते.पीकविमा मिळाला नाही म्हणून आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दुपारपर्यंत एकानेही मतदान केले नव्हते. भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे गावात पोहोचले. त्यांनी पालकमंत्री निलंगेकर यांच्याशी मोबाईलवर स्पीकर आॅन करून ग्रामस्थांशी संवाद घडवून आणला. त्यावेळी पीकविमा मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले, या आशयाची तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.बहिष्कार मागे घेतल्यानंतर सायंकाळी मतदान केंद्रात पोहोचलेल्या सर्वांचेच मतदान रात्री १०.३० पर्यंत सुरू होते.दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनीही सोशल मीडियावर अपलोड करून ‘व्होट फॉर नेशन-व्होट फॉर बीजेपी’ असा संदेश प्रसारित केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही तक्रार केली आहे.>आचारसंहितेचा भंग नाही : पालकमंत्रीआचारसंहितेचा भंग होईल, असा एक शब्दही उच्चारलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर आश्वासन दिले होते, त्याच अनुषंगाने त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, हे आपण बोललो. कोणाला मतदान करावे हेही बोललो नाही, असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
आनंदवाडीत रात्री साडेदहा नंतरही मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:51 AM