लातूर : लातूर लाेकसभेसाठी मंगळवार, ७ मे राेजी मतदान झाले. बुधवारी सकाळपर्यंत लातुरातील बार्शी राेडवरील महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँगरूममध्ये मतदान यंत्रे जमा करण्यात आली आहेत. आता या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेचा भार केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि स्थानिक पाेलिसांवर आहे. यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षकांकडून बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
लातूर लाेकसभेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून, मतदान झाल्यानंतर सायंकाळी लाेकसभा मतदान क्षेत्रातील एकूण २१२५ केंद्रांवरून मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्याचे काम सुरू झाले. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली, एका-एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे जमा करण्याचे काम सुरू हाेते. दरम्यान, मतदान यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया बुधवारी दुपारपर्यंत पार पडली.
‘स्ट्राँगरूम’चा परिसर सीसीटीव्हीच्या नजरकैदेत...लातुरातील बार्शी राेडवरील महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँगरूमवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सीसीटीव्हीची यंत्रण अपडेटस् करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कंट्राेल रूमही स्थापन करण्यात आले आहे. स्ट्राँगरूमचा आतील आणि बाहेरील संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नजरकैदेत राहणार आहे.
असा राहणार तगडा बंदाेबस्त..!पहिला स्तर : केंद्रीय राखीव दल - १ तुकडी - (३० जवान)दुसरा स्तर : राज्य राखीव दल - १ तुकडी - (३० जवान)तिसरा स्तर : पाेलिस निरीक्षक, ३, सपाेनि / पाेउपनि - ४
वरिष्ठ अधिकाऱ्यांची दरराेज स्ट्राँगरूमला भेट...लातूर शहरातील पाेलिस ठाण्यांचे अधिकारी रात्रीच्या वेळी गस्तीवर असतात. ते अधिकारी, पथक या स्ट्राँगरूमला दरराेज भेट देणार आहे. शिवाय, जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे हे स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
तीन शिप्टमध्ये केले बंदाेबस्ताचे नियाेजन...स्ट्राँगरूमच्या बंदाेबस्तासाठी जिल्हा पाेलिस दलाने आठ-आठ तासांच्या तीन शिप्टचे नियाेजन केले असून, २४ तास बंदाेबस्त राहणार आहे. यामध्ये केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि शस्त्रधारी पाेलिस, अधिकारी, कर्मचारी आठ तास कर्तव्यावर राहणार आहेत.- साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर