आशपाक पठाण, लातूर : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील गट नं. ६१५ मध्ये जाण्यासाठी ३० वर्षांपासून असलेला वहिवाट रस्ता एका शेतकऱ्याने अचानक बंद केला आहे. बंद केलेला रस्ता सुरू करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११९ दिवसांपासून एका शेतकरी दाम्पत्याने उपोषण सुरू केले आहे. प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खरोळा येथे अमीन रहीम शेख व तैमुनबी अमीन शेख यांनी ३० वर्षांपूर्वी ग.नं.६१५ मध्ये कायदेशीर स्वतंत्र जमीन खरेदी केली. तिथे शेतीवर विहीर, बैल-बारदाना उभा करून, आपले पक्के राहते घरही बांधले. शिवाय तेथेच आपल्या अपंग व गतिमंद मुलास ठेवून, त्यास अपंग जीमपण त्यांनी उभी केली. पुढे २-३ वर्षांनी समोर बाजूची, उर्वरित जमीन खरेदी केलेल्या एका शेतकऱ्याने त्यांची ती जुनी पारंपरिक वाट बंद केली आहे. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी २९ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रेणापूर तहसीलदारांना ७ पत्रे दिली. तातडीने लेखी अहवालही मागविला. ८ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी स्वत: रस्त्याची पाहणी करून इतर शेतकऱ्यांशी संवादही साधला. १७ दिवस झाले तरी अद्याप रस्ता खुला करण्यात आला नाही. जोपर्यंत रस्ता खुला केला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक अमीन शेख म्हणाले.