लातूर : ‘ड्राय रन’ची मोहीम लातूर जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लसीकरणाला प्रारंभ होत आहे. १६ जानेवारीपासून ११ सेंटरवर दिवसाला शंभर व्यक्तींना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल. त्यासाठी १७ हजार ३८० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, एमआयटी मेडिकल कॉलेज, विवेकानंद रुग्णालय तसेच रेणापूर ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय, औसा ग्रामीण रुग्णालय, मुरुड ग्रामीण रुग्णालय, चाकूर, जळकोट ग्रामीण रुग्णालय आणि निलंगा व उदगीर उपजिल्हा रुग्णालय या अकरा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. दिवसाला एका केंद्रावर शंभर व्यक्तींना लस देण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून, त्यासाठी १७ हजार ३८० जणांची नोंद करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती...
प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नावांची पडताळणी करण्यासाठी एक, लस देण्यासाठी एक, व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी दोघे आणि सुरक्षा रक्षक म्हणून एक असे पाच कर्मचारी केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. दररोज दिवसाला शंभर व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनेनंतर दुसरा टप्पा...
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांत इतर नागरिकांना लस दिली जाईल, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. ५० वर्षांच्या पुढील आणि अन्य आजार असलेल्या नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप शासनाकडून मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्याबाबत ठरविले जाईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.