- राजकुमार जाेंधळे लातूर : देशातील प्रमुख शहरांच्या मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुरू करण्याचे नियाेजन रेल्वे मंत्रालयाचे आहे. दरम्यान, मुंबई ते साेलापूर मार्गावर पंतप्रधानांच्या हस्ते ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे गत आठवड्यात उद्घाटन झाले. ज्या लातूरमध्ये ‘मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी’त वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी केली जात आहे. त्याच लातूरकरांना आता ‘वंदे भारत’साठी वेटिंगवर राहावे लागत आहे. एज्युकेशन हब म्हणून देशभरात नावारूपाला आलेल्या लातूर शहराला मुंबई- लातूर वंदे भारत एक्स्प्रेस सुविधा सुरू करावी, अशी मागणी लाेकप्रतिनिधींसह प्रवाशांतून जाेर धरत आहे.
लातूर शहर शैक्षणिक केंद्र असून, येथे राज्यातील काेना-काेपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’चा देशभरात बाेलबाला आहे. देशातील प्रमुख शहरांना लातूरशी जाेडण्यासाठी विमानसेवेबराेबरच रेल्वेसेवा अधिक महत्त्वाची आहे. दळणवळण गतिमान झाले तर लातूर शहरातील उद्याेगासह इतर क्षेत्रातील विकासाला गती मिळणार आहे. परिणामी, देशातील प्रमुख शहरांच्या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे. गत आठवड्यात साेलापूर ते मुंबई या मार्गावरही ‘वंदे भारत’ रेल्वे धावली असून, आता लातूर ते मुंबई मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ कधी सुरू हाेणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
लातूरमधून या रेल्वेगाड्या ‘सुसाट’लातूर रेल्वे स्थानकावरून दहा रेल्वेगाड्या सध्याला सुसाट आहेत. यामध्ये लातूर- मुंबई, बीदर- मुंबई एक्स्प्रेसला प्रवाशांचा माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे. त्यापाठाेपाठ लातूर- यशवंतपूर, काेल्हापूर- नागपूर, काेल्हापूर- धनबाद याही रेल्वेगाड्यांना प्रवासी वेटिंगवर आहेत. याचे रिझर्व्हेशन किमान आठवडाभरापूर्वीच करावे लागते. - राहुल गायकवाड, स्थानक प्रबंधक, लातूर
लातूर ते मुंबई मार्गावर हजाराे प्रवाशांची वर्दळ...लातूर रेल्वेस्थानकातून रात्री १०.३० वाजता धावणाऱ्या लातूर-मुंबई आणि बीदर- मुंबई एक्स्प्रेसला प्रवाशांची माेठी गर्दी आहे. हजाराे प्रवासी मुंबई- पुणे मार्गावर दरराेज प्रवास करत असल्याने रेल्वे विभागाच्या दैनंदिन उत्पन्नात माेठी वाढ हाेत आहे. त्यापाठाेपाठ इतर एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांची गर्दी आहे.
लातूरची रेल्वे देशभर धावणार...लातूरच्या नवीन एमआयडीसीत तीन टप्प्यांमध्ये ‘मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी’ असून, त्याचे तीन टप्प्यात काम हाेत आहे. पहिल्या टप्प्यात ११० एकरावर फॅक्टरीचे काम झाले आहे. आता या फॅक्टरीत तयार हाेणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे डबे देशभरात धावणार आहेत.