मास्क वापराबाबत जनजागृती मोहीम
लातूर : तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाउंडेशनच्या वतीने सोशल मीडियामधून मास्क वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विनाकारण बाहेर पडू नये, आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बाहेर गेल्यानंतर मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात आहे. या जनजागृती मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांना आधार
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब, गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी मोफत शिवभोजन देण्याचा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने राबविला जात आहे. जिल्ह्यात जवळपास २५ हून अधिक शिवभोजन केंद्रे आहेत. लातूर शहरातही दुपारी १२ ते २ या वेळेस शिवभोजन थाळीचे वितरण केले जात आहे. केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात असून, यामुळे गोरगरिबांना आधार मिळाला असल्याचे चित्र आहे.
लातूर शहरातील बुऱ्हाण नगर येथे वृक्षारोपण
लातूर : लातूर शहरातील बुऱ्हाण नगर येथे पक्षीमित्र महेबूब सय्यद यांच्या कुटुंबाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, प्रत्येकाने वृक्षारोपण केल्यास भविष्यात मदत होईल. यावेळी पक्षीमित्र महेबूब चाचा, अस्लम सय्यद, रेश्मा सय्यद, असद सय्यद, अक्रम सय्यद, नाझमीन सय्यद, अरुबा अक्रम, आर्शान अक्रम, आफिया अक्रम, शबाना सय्यद, खतिजा जावेद यांची उपस्थिती होती. बुऱ्हाण नगर येथे महेबूब चाचा यांनी जवळपास १५० हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. वेळोवेळी संगोपन आणि देखभाल केली जात असल्याने ही झाडे बहरली आहेत.
लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रम
लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस लातूर कपडा बँकेच्या वतीने डस्टबिन देण्यात आल्या. यावेळी कपडा बँकेचे उपाध्यक्ष विशाल अग्रवाल, अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख, उपअधिष्ठाता डाॅ. मंगेश सेलूकर, डाॅ. शैलेश चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संतोषकुमार डोपे, डाॅ. विनायक सिरसाट, डाॅ. स्नेहल सांगळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख यांनी कौतुक केले. अतिदक्षता विभागात प्रत्येक रुग्णाच्या शेजारी एक डस्टबिन ठेवली जाणार आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात स्वच्छता ठेवण्यास मदत होणार आहे. यावेळी लातूर कपडा बँकेचे सदस्य उपस्थित होते.
सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री
लातूर : शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे; मात्र शहरातील अनेक भागांत सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे अन्न आणि औषधी प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन विक्रीस आळा घालण्याची मागणी लातूर शहरातील नागरिकांमधून होत आहे.