लोकमत न्यूज नेटवर्क
औसा : ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाच्या पंचनाम्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. मात्र, तालुक्यातील १३३पैकी ७६ गावांमधील शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे शेतकरी अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. तालुक्यातील १३३पैकी ५७ गावांमधील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. परंतु, उर्वरित शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अनुदान मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करुन पेरणी केली. मात्र, दोन महिने झाले तरी अद्यापही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाकडे पाठपुरावा...
अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी, यासाठी कृषी सचिवांकडे पाठपुरावा केल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
लवकरच उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी सांगितले.